Monday 30 December 2019

Chapter 1 Part 1 (01-10) अध्याय १ भाग १ (१ - १०)

अध्याय १ -  श्लोक १ - १०

नमस्कार!

'सुरेखाज् गीताश्री' 

उद्देश हाच की गीतेचे श्लोक सहजरीत्या शब्दांची फोड करून म्हणता यावेत.  त्याचा अन्वयार्थ समजून घ्यावा या साठी हा माझा प्रयत्न.  

हा ब्लॉग माझे मत व्यक्त करते. ह्या मधे अनेक ग्रंथांचे, पुस्तकांचे, आॅन लाईन मिडीया, माझे सहकारी व आपणां सर्वांचेही संदर्भ व मार्गदर्शन समाविष्ट आहे. आपण आपल्या सद्सद्विवेकबुद्धीस अनुसरून व सत्यता पडताळणीकरुनच पुढील वाटचाल कराल ही खात्रीवजा अपेक्षा.


|| श्री परमात्मने नमः ||

अथ प्रथमोऽध्यायः |

पांडवांनी बारा वर्षाचा वनवास एक वर्षाचा अज्ञातवास संपवून आपले अर्धे राज्य मागितले पण दुर्योधनाने सुईच्या अग्रावर मावेल ईतकी जमीन सुद्धा देण्याचे नाकारले युद्ध होणार हे निश्चित झाले. महर्षी व्यासांनी संजयला दिव्यदृष्टी दिली. त्यांनी धृतराष्ट्राला युद्धातील संपूर्ण घटनांचा समाचार सांगितला.
                 
धृतराष्ट्र उवाच
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः l
मामकाः पाण्डवाश्र्चैव किमकुर्वत संजय llll


कुरुक्षेत्रात देवतांनी यज्ञ केला होता. कुरुराजांने तपश्चर्या केली होती. यज्ञादी धर्मीय कर्मे कुरुराजाची तपोभूमी असल्याने धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. संसारात प्रामुख्याने भूमी, धन स्त्री यासाठीच लढाया होतात. कुरु वंशाचा भूमीवर अधिकार त्यासाठीच युद्ध. आपल्या वैदिक संस्कृतीत सांगितले आहे की कोणतेही कार्य करायचे असेल तर ते धर्माला अनुसरूनच. युद्धात मरणाऱ्यांचा उद्धार व्हावा, कल्याण व्हावे म्हणून युद्धासारखे भयंकर कार्यही धर्मभूमी, तीर्थभूमीवरच होते. दोन्ही सैन्यांना युद्धाची ईच्छा होती पण दुर्योधनाला फार होती. मुख्य उद्देश राज्यप्राप्ती. मग त्यासाठी वाटेल ते. युधिष्ठिर मात्र धर्म रक्षणासाठी युद्धाला तयार झाला. धृतराष्ट्र आपल्या पांडुच्या पुत्रात समभाव कधीच पहात नव्हता. म्हणून त्यांनी मामकाः पाण्डवा असे शब्द वापरले. धृतराष्ट्रास संजय कडून सर्व लहानमोठ्या गोष्टी क्रमवार, विस्तारपूर्वक, योग्यप्रकारे जाणून घेण्याची ईच्छा होती.  दही घुसळल्यावर जसे लोणी निघते तसे धृतराष्ट्राच्या मनात झालेल्या चलबिचलांने युद्ध निर्माण झाले आणि अर्जुनाच्या मनात झालेल्या चलबिचलांने गीता प्रगट झाली.



         संजय उवाच
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदाl
आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत् llll


दोन्ही पक्षांकडील सैन्य युद्धासाठी कसे उभे राहिले ते संजय धृतराष्ट्राला सांगतो. पांडवांची सेना अत्यंत उत्तम रीतीने ऐक्यभावनेने उभी होती. त्या पक्षात धर्म श्रीकृष्ण होते त्यामुळे संख्येने कमी असूनही त्यांच्या सैन्यात तेज होते. त्याचा प्रभाव दुर्योधनावर फार मोठा पडला म्हणून तो द्रोणाचार्यांनजवळ जाऊन नीतीयुक्त अशी गंभीर वचने बोलतो.  दुर्योधनच सर्व राज्यकारभार पाहत होता म्हणून त्याला राजा असे संबोधले. धृतराष्ट्र नाममात्र राजा होता. द्रोणाचार्यांनजवळ जाण्याची तीन कारणे असतील. ---आपला स्वार्थ साधण्यासाठी पांडवांन बद्दल द्वेष भावना निर्माण करण्यासाठी. ---व्यवहारीक दृष्टीने गुरूंना वंदन करण्यासाठी ---युद्धामध्ये प्रमुख व्यक्तीचे योग्य ठिकाणी उभे राहणे महत्वाचे असते त्यासाठी.  दुर्योधन नीतीयुक्त अशी गंभीर वचने बोलतो ज्यामुळे द्रोणाचार्यांच्या मनांत पांडवांन विषयी द्वेष भावना निर्माण व्हावी आणि ते आपल्याच बाजूने राहून उत्तम प्रकारे लढावेत. आपलाच विजय होईल स्वार्थ साधला जाईल.



पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् |
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता llll


द्रोणाचार्यांनीच कौरवपांडवाना शस्त्रविद्या शिकवली. ते दोघांचेही गुरु आहेत. त्यामुळे त्यांनी कोणाचीही बाजू घेऊ नये. आचार्य आपणांस मारण्यासाठी उत्पन्न झालेल्या धृष्टद्युम्नालाही आपण शस्त्रास्त्र विद्या शिकवलीत तो शिष्य ही हुशार आहे. त्याचा उल्लेख द्रुपदपुत्र असा करतोय दुर्योधन कारण द्रुपद द्रोणाचार्यांच वैर होत आहे त्याचा बदला घ्यायची ही उत्तम संधी आहे.  द्रुपदपुत्राने व्यूहाकार रचना केली ती पांडवांची प्रचंड सेना पहा. तुम्हाला ठार करण्यासाठीच द्रुपदपुत्राला सेनापती केलाय. खर तर, कौरवांनी अकरा अक्षौहिणी सैन्य पांडवांन कडे सात अक्षौहिणी सैन्य आहे. तरीपण दुर्योधन पांडवांच्या सैन्याला प्रचंड सेना म्हणतो कारण त्याची रचना अशी केली होती की ते जास्त वाटत होते आणि दुसरे पांडवांच्यात एकी होती एकमत होते त्यामुळे ती प्रचंड बलवान वाटायची हे द्रोणाचार्यांना सारख सारख दाखवून द्यायचे. तुमच्या शिष्याचा पराभव करणे तुम्हाला सहज शक्य आहे.
आपण कोणत्या प्रकारांनी त्यांच्यावर विजय मिळवू शकू ह्याचा लवकर निर्णय घ्या



अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि l
युयुधानो विराटश्र्च द्रुपदश्र्च महारथः llll


विशाल धनुष्यावर बाण योजून प्रत्यंचा ओढण्यासाठी खूप शक्ती लागते. शक्तिशाली सोडलेला बाण अचूक मारा करतो. हे सगळे बलवान शूरवीर आहेत. सामान्य योद्धे नव्हेत. ते युद्धकलेमध्ये भीमार्जुन सारखे निपुण आहेत.
युयुधानो म्हणजे सात्यकी ज्यांनी अर्जुना कडून शस्त्रास्त्र विद्या शिकली. तो अर्जुनाच्या बाजुने युद्धासाठी ऊभा राहीला. द्रोणाचार्यांच्या मनांत अर्जुना विषयी द्वेष भावना निर्माण करण्यासाठी की तो आपल्या गुरुंन कडून लढतोय पण तुमचा शिष्य ज्याला तुम्ही सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवलत तो तुमच्या विरोधात आहे.  विराट राजाच नांव घेतो. ह्याच्या कडून आपला वीर सुशर्मा अपमानित झाला होता. आपणांसही त्यांने संमोहन अस्त्राने मोहीत केले होते आणि आम्हालाही त्याचा गायी सोडून पळावे लागले. तो आपल्या विरोधात आहे. विराट आहे नांव द्रुपद राजाच्या आधी. दुर्योधन महा चालाख  तो पद्धतशीरपणे द्रोणाचार्यांना उसकवत आहे. त्यांनी मन लावून युद्ध करावे.असे सगळे महारथी आपल्या समोर युद्धासाठी आहेत. युद्धामध्ये जो वीर दहादहा हजार धनुर्धारी सैन्याचे संचालन करु शकतो अशा वीर पुरुषास महारथी म्हणतात.



धृष्टकेतुश्र्चेकितानः काशिराजश्र्च वीर्यवान् l
पुरुजित्कुन्तिभोजश्र्च शैब्यश्र्च नरपुङ्गवः llll


धृष्टकेतुः हा शिशूपालाचा मुलगा. शिशूपालाचा वध श्रीकृष्णाने केला. तरी हा त्यांच्या कडूनच लढतोय.
चेकितानः हा यादव. सर्व यादव सेना माझ्या कडे आहे लढायला पण हा मात्र पांडवा कडून. काशिराजश्र्च वीर्यवान् काशिराज अत्यंत शूरवीर महारथी आहे. आपण अत्यंत सावधगिरींने युद्ध करायला हवे. पुरुजित्कुन्तिभोजश्र्च पुरुजित कुंतिभोज हे दोघेही कुंतिचे भाऊ, आमचे मामा पण ते ही पांडवांन कडे आहेत.  शैब्यश्र्च नरपुङ्गवः शैब्य युधिष्ठिराचा सासरा. मनुष्यांन मधे श्रेष्ठ बलवान आहे. तो ही त्यांच्या कडूनच आहे.


युधामन्युश्र्च विक्रान्त उत्तमौजाश्र्च वीर्यवान् l
सौभद्रो द्रौपदेयाश्र्च सर्व एव महारथाः llll


युधामन्युश्र्चविक्रान्तः उत्तमौजाश्र्चवीर्यवान्. पांचाल देशाचे अत्यंत बलवान शूरवीर योद्धे युधामन्यु उत्तमौजा माझ्या  वैऱ्याच्या, अर्जुनाच्या रथाच्या चाकांचे रक्षणासाठी नेमले आहेत. आपण त्यांच्या कडे लक्ष ठेवावे.
सौभद्रः श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा पुत्र अभिमन्यू. हा अत्यंत शूरवीर आहे. ह्यांने गर्भावस्थेतच चक्रव्यूह भेदनाची विद्या शिकला आहे. आपण जेंव्हा आपल्या सैन्याची चक्रव्युहाकार रचना करु तेंव्हा ह्याच्या कडे लक्ष ठेवायला लागेल. द्रौपदेयाश्र्च. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या पाच जणांचे द्रौपदीच्या उदरी जन्मलेले प्रतिविंध्य, सुतसोम, श्रुतकर्मा, शतानीक श्रुतसेन आहेत त्या पाचही जणांना ठार मारुन बदला घ्या. त्यांच्या आईने भरसभेत माझी थट्टा करुन ह्रदय दुखावले आहे. सर्व एव महारथाः. हे सर्व महारथी आहेत. // श्लोकात पांडवसेनेची विशेषता वर्णिले आहे दुर्योधनाने. आता पुढील तीन श्लोकात आपल्या सैन्याची विशेषता वर्णन करतो.



अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम l
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमिते llll

दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो ज्याप्रमाणे पांडवांच्या सैन्यामधे श्रेष्ठ महारथी आहेत त्याच प्रमाणे आपल्या सैन्यातही आहेत तर ते पांडव सैन्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचे आहेत. तिसऱ्या श्लोकात "पश्य" म्हंटलाय येथे तो "निबोध" म्हणतो. पश्य पांडवांचे सैन्य पुढे पहा आता निबोध कौरवांचे सैन्य आचार्यांच्या पाठीमागे आहे तिकडे ध्यान द्या. नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि  ते. माझ्या सेनेत सुद्धा जे विशिष्ट सेनापती, सेनानायक, महारथी आहेत त्यांची केवळ नांवे आपल्याला सांगतो बोटाने दाखवतो कारण आपण सर्वांनाच जाणता. येथे दुर्योधनाला म्हणायचे आहे आपला पक्ष कितीही बलवान असला तरी शत्रू पक्षाला कमी लेखू नका. श्रीकृष्ण स्वतः सर्व धर्मात्मे पांडव पक्षात असल्यांने त्यांचा प्रभाव होता हा प्रभाव दुर्योधनावरही पडला. पण दुर्योधनाचा भौतिक शक्तीवर विश्वास होता. अनित्यावर. म्हणून तो म्हणतो माझ्या पक्षात जी विशेषता आहे ती पांडव पक्षात नाही. आम्ही सहज त्यांच्यावर विजय मिळवू.


भवान्भीष्मश्र्च कर्णश्र्च कृपश्र्च समितिञ्जयः l
अश्र्वत्थामा विकर्णश्र्च सौमदत्तिस्तथैव llll

आपण स्वतः पितामह भीष्म या दोघांची बरोबरी कोणीच करु शकत नाही.आपल्या पुढे देवता, यक्ष, राक्षस कोणीही टीकाव धरणार नाही. कर्ण अत्यंत शूरवीर आहे. तो एकटाच पांडवं सेवेवर विजय मिळवेल. कृपाचार्य तर चिरंजीव आहेत. ते सुद्धा पांडवं सेनेवर विजय मिळवू शकतात. संग्रामविजयी असे त्यांना म्हंटले आहे. अश्वत्थामा ही शूरवीर आहेत. आपणा कडूनच शिक्षण घेतलाय आपले पुत्र आहेत. केवळ पांडवच धर्मात्मे नाहीत आमच्या पक्षातील विकर्ण सौमदत्ततचे पुत्र भूरिश्रवाही धर्मात्मे आहेत.  हे आचार्य आमच्या सैन्यामधे आपण स्वतः, भीष्माचार्य, कर्ण, कृपाचार्य जसे महान योद्धा आहात तसे पांडव सेनेत कोणी नाही. आमच्या सेनेत कृपाचार्य अश्वत्थामा हे दोघेही चिरंजीव आहेत पण पांडव सेनेत असे चिरंजीव कोणीच नाहीत. आमच्या सेनेत ही धर्मात्मे आहेत त्यामुळे घाबरण्याचे मुळीच कारण नाही.



अन्ये बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः l
नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाःllll


मी आत्ता पर्यंत आपल्या सैन्यातील जितक्या शूरवीरांची नांवे सांगितली त्यांच्या व्यतिरिक्त बाल्हीक, शल्य, जयद्रथ पण आहेत जे माझ्यासाठी प्राणार्पण करतील पण मागे हटणार नाहीत. हे सर्व लोक निरनिराळ्या शस्त्र कलेत प्रवीण आहेत निपुण आहेत. युद्ध कसे करावे, कोणत्या प्रकारे करावे, युक्त्या कोणत्या योजण्यात. दुर्योधनाची अशी वचने ऐकूनही द्रोणाचार्य काहीच बोलले नाहीत. तेंव्हा दुर्योधनाला आपली चालाखी, धूर्तपणा चालला नाही. आता पुढे तो काय म्हणतो ते पुढील श्लोकात पाहू.


अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् l
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ll१०ll

अधर्म, अन्याय यामुळे दुर्योधन भयभीत आहे. आपल सैन्य पांडवांन पेक्षा जास्त असूनही आपण पांडवांवर विजय मिळवण्यात असमर्थ आहोत असे त्याला वाटते कारण पांडवांच्यात एकी, संघटन, निर्णयात, निःसंकोचता आहे. ते आमच्यात नाही. भीष्मपितामहंचा कल पांडवांकडे आहे ते त्यांचेच कल्याण चिंतीतात. श्रीकृष्णाचे परम भक्त आहेत. युधिष्ठिराचा आदर आहे अर्जुनावर प्रेम आहे. मग ते आपले सेनापती असले तरी काय सामना करतील.
मला लहानपणापासून हरवत आलेला भीम  बलवान आहे. पांडवांचा संरक्षक आहे. त्यांने एकट्यानेच माझ्या सह शंभर कौरवांना मारण्याची प्रतिज्ञा केली आहे. त्याच शरीर वज्राप्रमाणे कठीण आहे. विषाचाही त्याच्यावर परीणाम झाला नाही. असा भीम त्यांचा संरक्षक आहे. इतकी भीती दुर्योधनाच्या मनांत असूनही तो द्रोणाचार्यांना पांडवांविरूद्ध भडकवतोय कारण अधर्मी, अन्यायी, पापी माणूस कधीही निर्भय सुखशांतीने राहू शकत नाही.
आता
 पुढील श्लोकात दुर्योधन पितामह भीष्मांना काय म्हणतो ते पुढील ब्लॉगमधे  पाहू.

 

Disclaimer: The views expressed are my personal opinions and the blog is for generic information purpose only. Readers are advised to verify the facts.All content provided in the blog is for informative purpose only. The owner of this blog makes no representations as to the accuracy or completeness of any information on this blog or bound by following any link on this blog. The owner will not be liable for any errors or omissions in the information nor for the availability of the information. The owner will not be liable for any losses, injuries or damages from display or use of this information. These terms and conditions of use are subject to change at any time and without notice.