Saturday 4 January 2020

Chapter 1 Part 5 (40-47) अध्याय १ भाग ५ (४०-४७)

नमस्कार!  

'सुरेखाज् गीताश्री' 

उद्देश हाच की गीतेचे श्लोक सहजरीत्या शब्दांची फोड करून म्हणता यावेत.  त्याचा अन्वयार्थ समजून घ्यावा या साठी हा माझा प्रयत्न.  

हा ब्लॉग माझे मत व्यक्त करते. ह्या मधे अनेक ग्रंथांचे, पुस्तकांचे, आॅन लाईन मिडीया, माझे सहकारी व आपणां सर्वांचेही संदर्भ व मार्गदर्शन समाविष्ट आहे. आपण आपल्या सद्सद्विवेकबुद्धीस अनुसरून व सत्यता पडताळणीकरुनच पुढील वाटचाल कराल ही खात्रीवजा अपेक्षा.

आपण *Surekha's Geetashree* या नावाचे YouTube channel सुरू केले आहे.पहिल्या अध्यायाचे काही श्लोक यावर upload केले आहेत. तरी सर्वांनी *Surekha's Geetashree* या channel ला *Like* करा, *Subscribe* करा व नविन श्लोक अपलोड केल्याचे notification येण्यासाठी *Bell icon* दाबा.

खालील लिंकवर दाबून channel ला subscribe करा.

Channel Subscription विनामूल्य आहे.

||  श्री परमात्मने नमः ||

कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः l
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ll४०ll

कुलक्षये, प्रणश्यन्ति, कुलधर्माः, सनातनाः,
धर्मे, नष्टे, कुलम्, कृत्स्नम्, अधर्मः, अभिभवति, उत ll४०ll

जेंव्हा युद्ध सुरू होते तेंव्हा त्यात कुलाचा(वंशाचा) क्षय होतो. कुळधर्म , कुळाच्या पवित्र परंपरा, रीतीरिवाज, मर्यादा ह्या देखील चालत आलेल्या आहेत. त्याच्या बरोबर असणारे धर्म नष्ट होतील. जन्म झाल्यावर, मौजीबंधन,विवाह, मृत्यू समयी व त्यानंतरचे शास्त्रोक्त पवित्र रीतीरिवाज जे इहलोकी व परलोकी मनुष्याचे कल्याण करतात ते सर्व नष्ट होतील कारण कुलाचाच नाश झालातर कुला बरोबर राहणारे धर्म कसे राहतील?
जेंव्हा काळच नष्ट होईल तेंव्हा धर्मविरोधी कर्म केली जातील. अधर्माचे प्राबल्य वाढेल. कर्ता पुरुषच युद्धात गेला तर बालक व स्त्रियाच राहतील. त्यांना उत्तम शिक्षण देणारेच नसतील तर ते अधर्मानेच वागतील.

अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः l
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः ll४१ll

अधर्माभिभवात्, कृष्ण, प्रदुष्यन्ति, कुलस्त्रियः,
स्त्रीषु, दुष्टासु, वार्ष्णेय, जायते, वर्णसंकरः ll४१ll

धर्माचे पालन केल्याने अंतःकरण शुद्ध होते त्यामुळे बुद्धी सात्विक बनते व विवेक जागृत होतो. परंतु जेंव्हा कुळात अधर्म वाढतो तेंव्हा आचरण अशुद्ध होते त्यामुळे अंतःकरण अशुद्ध बनते, बुद्धी तामसी होते, मनुष्य कर्तव्य टाळतो, शास्त्रा विरुद्ध विचार करू लागतो. कुलस्त्रिया दुषित होतात, वर्णसंकर होतो.
मग, हे कृष्णा, तूच सांग, आमच्या कुलाला मग कोठे न्याल? त्याला काय म्हणाल? कोणता वंश म्हणाल? म्हणून कुळाचा नाश करणे योग्य नाही.
वार्ष्णेय - श्रीकृष्णाने वृष्णी वंशात अवतार घेतला म्हणून त्यांना वार्ष्णेय म्हणतात

सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च l
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ll४२ll

संकरः, नरकाय, एव, कुलघ्नानाम्, कुलस्य, च,
पतन्ति, पितरः, हि, एषाम्, लुप्तपिण्डोदकक्रियाः ll४२ll

वर्णसंकर झाल्याने कुलधर्माचे पालन, कुलपरंपरा नष्ट होतात. श्राद्ध तर्पण होत नाही त्यामुळे पितरही त्यांच्या स्थानातुन खाली येतात. आदरबुद्धीने, शास्त्रा नुसार श्राद्ध तर्पण करावे.

दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः l
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्मश्र्च शाश्वताः ll४३ll

दोषैः, एतत्, कुलघ्नानाम्, वर्णसङ्करकारकैः,
उत्साद्यन्ते, जातिधर्माः, कुलधर्माः, च, शाश्वताः ll४३ll
युद्धात कुलाचा नाश झाल्याने पूर्वापार चालत आलेले कुलधर्म नष्ट होतात. जातिधर्म नष्ट होतात. कुलधर्म---कुलाची वेगळी परंपरा, रीतीरिवाज, मर्यादा, आचरण. जातिधर्म —संपूर्ण कुलसमुदायाचे रीतीरिवाज, मर्यादा, आचरण होय. 

आपण *Surekha's Geetashree* या नावाचे YouTube channel सुरू केले आहे.पहिल्या अध्यायाचे काही श्लोक यावर upload केले आहेत. तरी सर्वांनी *Surekha's Geetashree* या channel ला *Like* करा, *Subscribe* करा व नविन श्लोक अपलोड केल्याचे notification येण्यासाठी *Bell icon* दाबा.

खालील लिंकवर दाबून channel ला subscribe करा.

Channel Subscription विनामूल्य आहे.

उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन l
नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ll४४ll

उत्सन्नकुलधर्माणाम्, मनुष्याणाम्, जनार्दन,
नरके, अनियतम्, वासः, भवति, इति, अनुशुश्रुम ll४४ll

भगवंतानी मनुष्याला विवेक दिला आहे, नवीन कर्म करण्याचा अधिकार दिला आहे. तो कर्म करण्यांस स्वतंत्र आहे - चांगले किंवा वाईट. खरे तर त्याने विचारपूर्वक चांगलेच कर्म करायला हवे पण तो सुखोपभोगाच्या लोभात फसतो व आपला विवेक घालवतो. षड्रिपूत अडकतो व त्याचे आचरण धर्माविरोधी होऊ लागते. त्याचा परिणाम इहलोकी निंदा, अपमान, तिरस्कार होतो तर परलोकात दुर्गती, नरकाची प्राप्ती होते व नरकयातना भोगाव्या लागतात असे आम्हीं परंपरेने वडिलधाऱ्यांकडून व गुरुजनांकडून ऐकत आलो आहोत. ह्या सर्व अनर्थ वर्णनाचा स्वतः अर्जुनावर काय परिणाम झाला ते पाहू.

अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् l
यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ll४५ll

अहो, बत, महत्पापम्, कतुम्, व्यवसिताः, वयम्,
यत् , राज्यसुखलोभेन, हन्तुम्, स्वजनम्, उद्यताः ll४५ll

अहो हे पद आश्चर्यवाचक आहे व बत हे पद खेदवाचक आहे. धर्म-अधर्म, पापपुण्य, कर्तव्य-अकर्तव्य याला जाणणारे आम्ही पाप करण्याचा निश्चय करतोय ही खेदाची गोष्ट आहे व आश्चर्याचीही. ती बरोबर नाही.
आपल्या सद्विचारांचा, माहितीचा आदर केल्यानेच मनुष्य, शास्त्र, गुरुजन यांची आज्ञा पाळू शकतो. याचा अनादर केल्यास, आम्हांस अनर्थपरंपरेपासून कोण रोखेल?

येथे अर्जुनाची दृष्टी युद्धा कडे आहे. या युद्धाला दोषी समजून तो दूर जाऊ इच्छितो. परंतु खरा दोष कोणता याकडे त्याचे लक्षच नाही. युद्धात कौटुंबिक मोह, स्वार्थभाव, कामना हे दोष आहेत पण त्याचे लक्ष याकडे नाही जे वास्तविक कोणत्याही विचारशील, धर्मात्मा, शूरवीर क्षत्रियासाठी योग्य नाही.

यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयःl
धार्तराष्ट्राः रणे हन्युःस्तन्मे क्षेमतरं भवेत् ll४६ll

यदि, माम्, अप्रतीकारम्, अशस्त्रम्, शस्त्रपाणयः,
धार्तराष्ट्राः, रणे, हन्युः, तत्, मे, क्षेमतरम्, भवेत् ll४६ll

जर मी युद्धा पासून निवृत्त झालो तर दुर्योधनही निवृत्त होईल. आम्ही लढलोच नाही तर युद्ध का होईल? पण समजा त्यांना आमचा काटाच काढायचा असेल तर ते आम्हांला ठार मारतील व ते आम्हांस कल्याणकारी असेल. कारण मी जे युद्ध करुन गुरुजनां ठार करण्याचा निश्चय केला होता त्या पापातूंन मुक्त होईन. माझे प्रायश्चित्त होईल. मी शुद्ध होईन व माझ्या कुलाचाही नाश होणार नाही.
अर्जुनाने शोकाविष्ट होऊन २८ श्लोका पासून बोलण्यांस प्रारंभ केला तेंव्हा ते शोकविव्हळ नव्हते. जितके ते आता आहेत. तो युद्धा पासून दूर जात आहे, धनुष्यबाणाचाही त्याग करत आहे व खाली बसत आहे. भगवंत अर्जुन बोलत असतांना मधे काहीच बोलले नाहीत कारण अर्जुनाच्या अंतःकरणात कोणताही शोक राहिला नाही तरच भगवंताच्या बोलण्याचा परिणाम होईल. त्याचा वेग उतरल्यावरच आपण बोलावे.
विधिलिखितास थांबवणे मनुष्याच्या हातातील गोष्ट नाही. परंतु आपल्या कर्तव्याचे पालन करुन मनुष्य आपला उद्धार करु शकतो व कर्तव्यच्युत होऊन आपले पतन करु शकतो. भगवंतानी अर्जुनाला कर्तव्याचे ज्ञान करवून मनुष्यमात्राला उपदेश केला आहे की त्यांने शास्त्राज्ञे नुसार आपल्या कर्तव्याचे पालन करण्यात तत्पर असावे त्यापासून कधीही पाठ फिरवू नये.

आपण *Surekha's Geetashree* या नावाचे YouTube channel सुरू केले आहे.पहिल्या अध्यायाचे काही श्लोक यावर upload केले आहेत. तरी सर्वांनी *Surekha's Geetashree* या channel ला *Like* करा, *Subscribe* करा व नविन श्लोक अपलोड केल्याचे notification येण्यासाठी *Bell icon* दाबा.

खालील लिंकवर दाबून channel ला subscribe करा.

Channel Subscription विनामूल्य आहे.

संजय उवाच
एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् l
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ll४७ll

एवम्, उक्त्वा, अर्जुनः, संख्ये, रथोपस्थे, उपाविशत्,
विसृज्य, सशरम्, चापम्, शोकसंविग्नमानसः ll४७ll

युद्ध करणे हे संपूर्ण अर्थांचे मूळ कारण आहे, युद्ध करण्याने कुटुंबियांचा नाश होईल व परलोकात नरकाची प्राप्ती होईल असे म्हणून शिकावे. व्याकुळ झालेल्या अर्जुनाने युद्ध न करण्याचा पक्का निर्णय केला. ज्या रणभूमीवर हातात धनुष्य घेऊन उत्साहाने आला होता त्याच रणभूमीवर आपल्या हातातील गाण्डीव खाली ठेवले आणि स्वतः ज्या सैन्याला पाहण्यासाठी रथात उभा होता तेथेच शोकविव्हळ स्थितीत बसला.

ॐ तत्सदिती श्रीमद्भगवदगीतासूपनिषत्सु ब्रम्हविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णर्जुनसंवादेऽर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः ll१ll
प्रत्येक अध्यायाच्या शेवटी महर्षी वेदव्यांसानी ही उपरोक्त पुष्पलता लिहिली ज्यातून श्रीमद्भगवदगीतेचे विशेष महात्म्य आणि प्रभाव प्रगट होतो.
ॐ तत् सत्----ही तिन्ही परमात्म्याची पवित्र नांवे आहेत. ही सर्व जीवांचे कल्याण करणारी नांवे आहेत. यांचा उच्चार केल्याने मनुष्य परमात्मा सम्मुख होतो आणि शास्त्र विहित कर्तव्य कर्माचे वैगुण्य नाहीसे होते. गीतेचा अध्यायाचा पाठ म्हणत असता काही उणिवा राहील्या असतील तर त्यांच परिमार्जन होते. म्हणून"ॐतत्सत्"
श्रीमत्---सर्व शोभा संपन्न आहेत आणि ज्यांच्या ठिकाणी ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान व वैराग्य आहे त्या भगवंताच्या मुखातून प्रगट झालेली. श्रीमत् भगवत्गीता---भगवंतानी मस्तीत येऊन गायली म्हणून गीता.
उपनिषद्---सर्व उपनिषदांचे सार.
ब्रम्हविद्या---वर्ण, आश्रम, संप्रदाय ह्यांचा आग्रह न ठेवता पाराणिमात्रांचे कल्याण करणारी सर्व श्रेष्ठ विद्या.
योगशास्त्रे----कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, ध्यानात साधनांची माहिती ज्याद्वारे साधकाला परमात्म्याशी नित्य संबंध यावा.
श्रीकृष्णार्जुनसंवाद---हा साक्षात पुरुषोत्तम भगवान् श्रीकृष्ण आणि भक्त अर्जुन यांचा संवाद. अर्जुनाने निःसंकोचभावाने प्रश्न विचारले आहेत आणि भगवंतानी उभारलेले त्याची उत्तरे दिली आहेत. यात उभयतांचे भाव आहेत म्हणून.
या पहिल्या अध्यायात अर्जुनाच्या विषादाचे वर्णन आहे. हा विषाद सुद्धा भगवंत अथवा सत्संग झाल्यास संसारा विषयीवैराग्य निर्माण करून कल्याणकारी करणारा होतो. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी पुष्पिका देण्याचे तात्पर्य हे "जर साधक एका अध्यायाचा ही योग्य रितीने पठणपाठण विचार करेल तर एकाच अध्यायाचे त्याचे कल्याण होईल.

संदर्भ : श्रीमद्भगवद्गीता साधक - संजीवनी मराठी टीका - स्वामी रामसुखदास (गीता प्रेस गोरखपुर)

Disclaimer: The views expressed are my personal opinions and the blog is for generic information purpose only. Readers are advised to verify the  facts.All content provided in the blog is for informative purpose only. The owner of this blog makes no representations as to the accuracy or completeness of any information on this blog or bound by following any link on this blog. The owner will not be liable for any errors or omissions in the information nor for the availability of the information. The owner will not be liable for any losses, injuries or damages from display or use of this information. These terms and conditions of use are subject to change at any time and without notice.

Chapter 1 Blog 4 (31-39) अध्याय १ भाग ४ (३१ - ३९)

नमस्कार!  

'सुरेखाज् गीताश्री' 

उद्देश हाच की गीतेचे श्लोक सहजरीत्या शब्दांची फोड करून म्हणता यावेत.  त्याचा अन्वयार्थ समजून घ्यावा या साठी हा माझा प्रयत्न.  

हा ब्लॉग माझे मत व्यक्त करते. ह्या मधे अनेक ग्रंथांचे, पुस्तकांचे, आॅन लाईन मिडीया, माझे सहकारी व आपणां सर्वांचेही संदर्भ व मार्गदर्शन समाविष्ट आहे. आपण आपल्या सद्सद्विवेकबुद्धीस अनुसरून व सत्यता पडताळणीकरुनच पुढील वाटचाल कराल ही खात्रीवजा अपेक्षा.

आपण *Surekha's Geetashree* या नावाचे YouTube channel सुरू केले आहे.पहिल्या अध्यायाचे काही श्लोक यावर upload केले आहेत. तरी सर्वांनी *Surekha's Geetashree* या channel ला *Like* करा, *Subscribe* करा व नविन श्लोक अपलोड केल्याचे notification येण्यासाठी *Bell icon* दाबा.

खालील लिंकवर दाबून channel ला subscribe करा.

Channel Subscription विनामूल्य आहे.

||  श्री परमात्मने नमः ||

निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव l
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्या स्वजनमाहवे ll३१ll

निमित्तानि, च, पश्यामि, विपरीतानि, केशव,
न, च, श्रेयः, अनुपश्यामि, हत्या, स्वजनम्, आवहे ll३१ll

हे केशवा, मी शकुनही विपरीतच पाहत आहे. जितका उत्साह जास्त तितके कार्य चांगले होते पण येथे तर माझा सुरुवातीलाच उत्साह भंग झाला. मनांत संकल्प विकल्पही योग्य नाहीत मग परिणाम काय होणार! वैयक्तिक  शकुनही चांगले नाहीत व आकाशातून उल्कापात होताहेत, अवेळी ग्रहण लागले आहे, भूकंप, पशुपक्ष्यांचे   भयंकर ओरडणे, ढगातून रक्ताचा पाऊस पडणे हे सर्व अपशकुन आहेत. भविष्यातील अनिष्ट सूचना दिसत आहे. युद्धामध्ये, आपल्याच कुटुंबातील लोकांना मारुन आम्हांला काय लाभ? त्यामुळे आम्हाला हा लोक व परलोक हितकारक नाही कारण कुलाचा नाश केला तर पाच लागणार ना. नरकातच जाऊ. म्हणून मला या दोन्हीही कारणाने युद्धाचा आरंभ व त्याचा परिणाम आमच्या साठी व संपुर्ण संसारासाठी हितकारक नाही असे वाटते.

न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च l
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ll३२ll

न, काङ्क्षे, विजयम्, कृष्ण, न, च, राज्यम्, सुखानि, च,
किम्, नः, राज्येन, गोविन्द, किम्, भोगैः, जीवितेन, वाll३२ll

असे समजून चालू की युद्धामध्ये आम्हाला विजय मिळेल, संपूर्ण पृथ्वीवर आमचेच राज्य व अधिकार होईल. अनेक प्रकारची सुख मिळतील परंतु मला कशाचीच अपेक्षा नाही. मला विजय, राज्य, सुख नकोच. कुटुंबियांना मारुन सुखपभोग घेण्यात काय अर्थ. कुटुंबियांसाठीच सर्व भोग हवे असतात.  तेच नसतील तर काय उपयोग!

येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च l
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ll३३ll

येषाम्, अर्थे, काङ्क्षितम्, नः, राज्यम्, भोगाः, सुखानि, च,
ते, इमे, अवस्थितः, युद्धे, प्राणान्, त्यक्त्वा, धनानि, च ll३३ll

व्यक्तिगत सुखासाठी आम्हांला राज्य, सुख, भोग ह्याची ईच्छा नाही तर ती आमच्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी, स्नेह्यांसाठी हवी आहे. पण तेच जर आमच्या समोर युद्धासाठी उभे राहिले तर मग हे राज्य, धन कोणासाठी मिळवायचे  त्यांना प्राणाची अथवा धनाची ईच्छाच नाही, ते मरण्यासाठीच युद्धाला उभे राहिले.

आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः l
मातुलाः  श्र्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा ll३४ll

आचार्याः, पितरः, पुत्राः, तथा, एव, च, पितामहः,
मातुलाः, श्र्वशुराः, पौत्राः, श्यालाः, सम्बन्धिनः, तथा ll३४ll

एतान अन हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन l
अपि त्रैलोक्यराजस्य होतो किं नु महीकृते ll३५ll

एतान्, न, हन्तुम्, इच्छामि, घ्नतः, अपि, मधुसूदन,
अपि, त्रैलोक्यराजस्य, हेतोः, किम्, नु, महीकृते ll३५ll

जर हे आमचे कुटुंबातील लोक क्रोधित होऊन माझ्यावर प्रहार करणार असतील तर करु देत; मी त्यांना मारणार नाही. जर ते आपल्या इष्ट प्राप्ती साठी मला मारणार असतील तर ते मारु देत; मी मात्र क्रोधात अथवा लोभात फसून नरकात जाणार नाही. त्यांना मारल्याने मला त्रैलोक्याचे राज्य मिळणार असेल तरीही मी त्यांना मारु इच्छित नाही. 
मधुसूदन, आपण दैत्याला मारणारे आहात पण येथे दैत्य कोणीच नाही हे तर सगळे आमचे जवळचे महत्वाचे नातलग आहेत. आचार्य, पितर, पुत्र, पितामह, मातुल, श्र्वशुर, पौत्र, श्यालाः, संबधीतांचे पालनपोषण करायची जबाबदारी माझीअसतांना मला त्रैलोक्याचे राज्य मिळेल म्हणून त्यांना मारणे संपूर्णपणे अनुचित आहे.
ह्या श्लोकात स्वजनांना न मारण्याचे दोन हेतू अर्जुनांनी सांगितले.

आपण *Surekha's Geetashree* या नावाचे YouTube channel सुरू केले आहे.पहिल्या अध्यायाचे काही श्लोक यावर upload केले आहेत. तरी सर्वांनी *Surekha's Geetashree* या channel ला *Like* करा, *Subscribe* करा व नविन श्लोक अपलोड केल्याचे notification येण्यासाठी *Bell icon* दाबा.

खालील लिंकवर दाबून channel ला subscribe करा.

Channel Subscription विनामूल्य आहे.

निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन l
पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः ll३६ll

निहत्य, धार्तराष्ट्रान्, नः, का, प्रीतिः, स्यात्, जनार्दन,
पापम्, एव, आश्रयेत्, अस्मान्, हत्वा, एतान्, आततायिनः ll३६ll.

धृतराष्ट्राचे पुत्र व त्यांचे सहकारी यांना मारुन आम्हांला काय, आनंद होईल का? जरी आम्ही क्रोधाने अवेगात येऊन त्यांना मारले तरी जेंव्हा हा आवेग शांत होईल तेंव्हा आम्हांला रडावेच लागेल. आम्ही किती अनर्थ केला म्हणून. पश्चाताप वाटेल, सारखी त्यांची आठवण येईल. मग आम्हांस आनंद कसा, प्रसन्नता कशी? आणि जे पाप आम्हांला लागेल ते परलोकात भयंकर दुःख देणारे असेल.

आतातायी सहा प्रकारचे असतात १-आग लावणारा २-हातात शस्त्र घेऊन मारण्यास सज्ज झालेला ३-संपत्ती हरण करणारा ४- राज्य बळकवणारा ५- स्त्री चे हरण करणारा. दुर्योधन इत्यादींमध्ये ही सहाही लक्षणे होतीच.
शास्त्र वचनाचा प्रमाणे आतातायी लोकांना मारण्यात मारणाऱ्यास काहीही दोष लागत नाही. असे असूनही मनुष्याने कोणाचाही हत्या करु नये असेही शास्त्र सांगते. मग मी माझ्या कुटुंबियांची हत्या का करु? कुलाचा नाश का करु?

तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान स्वबांधवान् l
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ll३७ll

तस्मात्, न, अर्हाः, वयम्, हन्तुम्, धार्तराष्ट्राणान्, स्वबांधवान्,
स्वजनम्,हि,कथम्,हत्वा,सुखिनः,स्याम,माधव ll३७ll

आतापर्यंत (अध्याय १ मधील २८ व्या श्लोका पासून ते ३७ व्या श्लोकापर्यंत) कुटुंबियांना न मारण्याविषयी जो काही युक्तिवाद केला, प्रमाण दिले गेले, विचार प्रगट केले त्यां प्रमाणे आम्ही असे अनर्थकारी काम कसे करु? ती आमची प्रवृत्ती नाही.
हे माधवा, ह्या कुटुंबियांच्या मरणाच्या कल्पनेने अत्यंत दुःख, संताप होतोय आणि खरच जर त्यांना मारले तर आम्हांला किती दुःख होईल? आम्ही कसे सुखी होऊ?
घनिष्ठसंबंधी ममताजन्य मोह उत्पन्न झाला त्यामुळे क्षत्रियोचित कर्तव्याकडे अर्जुनांने पाठ फिरवली आहे कारण जेंव्हा मोह होतो तेंव्हा विवेक दबला जातो. विवेक दबल्यांने मोहाचे पारडे जड होते. तसे झाले की कर्तव्याचे स्पष्ट भान राहत नाही.

यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः l
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् ll३८ll

यद्यपि, एते, न, पश्यन्ति, लोभोपहतचेतसः,
कुलक्षयकृतम्, दोषम्, मित्रद्रोहे, च, पातकम् ll३८ll

इतके मिळाले, आणखी मिळो, पुढेही असेच मिळत राहो. घरदार, जमीनजुमला, आदरप्रशंसा, पद, अधिकार हे वाढतच जाते. लोभ वाढतो. तसा दुर्योधनाचा वाढला. त्यामुळे त्याची विवेकशक्ती नाहिशी झाली. त्याच्या मनांत हे ही येत नाही की ज्या राज्यासाठी मी इतके पाप करतोय ते राज्य तरी किती दिवस आपल्याकडे राहील. आपण जगलो काय किंवा मेलो काय, नुकसान आपलेच आहे.
ज्या ठिकाणी लढाई होते तेथे वेळ, शक्ती, संपत्ती यांचा नाश होतो. अनेक प्रकारच्या चिंता व संकटे येतात. मित्रांमध्ये मतभेद व वैर उत्पन्न होते.

आपण *Surekha's Geetashree* या नावाचे YouTube channel सुरू केले आहे.पहिल्या अध्यायाचे काही श्लोक यावर upload केले आहेत. तरी सर्वांनी *Surekha's Geetashree* या channel ला *Like* करा, *Subscribe* करा व नविन श्लोक अपलोड केल्याचे notification येण्यासाठी *Bell icon* दाबा.

खालील लिंकवर दाबून channel ला subscribe करा.

Channel Subscription विनामूल्य आहे.

कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् l
कुलक्षयकृतं दोषं प्रपस्यद्भिर्जनार्दन ll३९ll

कथम्, न, ज्ञेनम्, अस्माभिः, पापात्, अस्मात्, निवर्तितुम्,
कुलक्षयकृतम्, दोषम्, प्रपश्यद्भिः, जनार्दन ll३९ll

आता अर्जुन म्हणतो, दुर्यौधनाचे, आपल्या कुलक्षयामुळे होणाऱ्या दोषाकडे व मित्रद्रोहामुळे होणाऱ्या पापाकडे लक्ष नाही पण आम्ही त्या कुलक्षयामुळे होणाऱ्या अनर्थ परंपरेकडे लक्ष दिलेच पाहिजे. कुलक्षयामुळे होणारे पाप, मित्रद्रोहामुळे होणारे पाप आम्ही उत्तम रीतीने जाणतो. मित्रांनी आम्हांला दुःख दिलेच तर ते अनिष्टकारी नाही. कारण त्यामुळे आमच्या पूर्व पापांचा नाश होईल. आम्ही शुद्ध होऊ. पण आमच्या मनांत वैरभाव असेल तर तो मेल्याबरोबरही आमच्या बरोबरच येईल. म्हणून आम्ही आमची शिदोरी युद्धरुपी पापाने का भरु?
स्वतः अर्जुन कौटुंबिक मोहात गुंतला आहे. आपल्या कर्तव्या पासून दूर जातोय. हा त्याच्यातील दोष आहेच ना.
अर्जुनाला दुर्योधनाचे दोष दिसतात पण स्वतःचे दोष चांगुलपणाच्या आड लपले आहेत. दोष कोणते हे पुढील पाच श्लोकात सांगितले आहे ते पुढील ब्लॉगमध्ये पाहू.

Disclaimer: The views expressed are my personal opinions and the blog is for generic information purpose only. Readers are advised to verify the  facts.All content provided in the blog is for informative purpose only. The owner of this blog makes no representations as to the accuracy or completeness of any information on this blog or bound by following any link on this blog. The owner will not be liable for any errors or omissions in the information nor for the availability of the information. The owner will not be liable for any losses, injuries or damages from display or use of this information. These terms and conditions of use are subject to change at any time and without notice.

Chapter 1 Part 3 (21-30) अध्याय १ भाग ३ (२१ - ३०)

अध्याय पहिला  श्लोक २१ - ३० 

नमस्कार!

'सुरेखाज् गीताश्री' 

उद्देश हाच की गीतेचे श्लोक सहजरीत्या शब्दांची फोड करून म्हणता यावेत.  त्याचा अन्वयार्थ समजून घ्यावा या साठी हा माझा प्रयत्न.  

हा ब्लॉग माझे मत व्यक्त करते. ह्या मधे अनेक ग्रंथांचे, पुस्तकांचे, आॅन लाईन मिडीया, माझे सहकारी व आपणां सर्वांचेही संदर्भ व मार्गदर्शन समाविष्ट आहे. आपण आपल्या सद्सद्विवेकबुद्धीस अनुसरून व सत्यता पडताळणीकरुनच पुढील वाटचाल कराल ही खात्रीवजा अपेक्षा.

आपण *Surekha's Geetashree* या नावाचे YouTube channel सुरू केले आहे.पहिल्या अध्यायाचे काही श्लोक यावर upload केले आहेत. तरी सर्वांनी *Surekha's Geetashree* या channel ला *Like* करा, *Subscribe* करा व नविन श्लोक अपलोड केल्याचे notification येण्यासाठी *Bell icon* दाबा.

खालील लिंकवर दाबून channel ला subscribe करा.

Channel Subscription विनामूल्य आहे.

|| श्री परमात्मने नमः ||

अथ प्रथमोऽध्यायः |

ह्रषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते l
               अर्जुन उवाच
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ll२१ll

ह्रषीकेशम्, तदा, वाक्यम्, इदम्, आह, महीपते, 

अर्जुन उवाच  
सेनयोः, उभयोः, मध्ये, रथम्, स्थापय, मे, अच्युत ll२१ll

अर्जुन शूरतेने, उत्साहाने, कर्तव्याने भरलेले बोलणे असणारा  तो भगवान श्रीकृष्णाना जे जगद्गुरू, अंतर्यामी, मन बुद्धीचे प्रेरक आहेत त्यांना म्हणाला, रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा कर. ज्यामुळे मला दोन्ही सैन्यांना सहज रीतीने पाहता येईल.
'सेनयोरुभयोर्मध्ये' हे पद गीतेत तीन वेळा आले आहे. २१ व्या श्लोकात शौर्याने रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी, २४ व्या श्लोकात कुरुवंशीयांना पाहण्यासाठी आणि अध्याय २ मधील १० वा श्लोक विषादयुक्त अर्जुनाला गीतेचा उपदेश.
आता येथे हे लक्षात येते प्रथम अर्जुनात शूरवीरता होती, मध्यंतरी कुटुंबीयांना पाहिल्याने तो मोहाने युद्धापासून परावृत्त झाला आणि शेवटी त्याला भगवंताकडून गीतेचा महान उपदेश प्राप्त झाला. मोह नष्ट झाला. मग आपण कोठेही असू कोणत्याही परिस्थितीत असू त्या परिस्थितीत निष्काम होऊन परमात्म्याची प्राप्ती करु शकतो.
अशा ठिकाणी रथ उभा कर की मी सर्वांना पाहू शकेन, त्यांच्या सामर्थ्याचा अंदाज घेऊ शकेन.

यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् l
कैर्मया सह योद्धव्यमस्मिनरणसमुद्यमे ll२२ll

यावत्, एतान, निरीक्षे, अहम्, योद्धुकामान्, अवस्थितान्,
कैः, मया, सह, योद्धव्यम्, अस्मिन् रणसमुद्यमे ll२२ll

श्रीकृष्ण म्हणतात दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ कुठ पर्यंत उभा करायचा? अर्जुन म्हणाला जो पर्यंत मी युद्धाच्या ईच्छेने असलेल्या कौरवसैन्यातील राजे लोकांना पाहू शकेन तो पर्यंत. मला कोणाशी युद्ध करायचे आहे, माझ्या बरोबरीचे कोण, माझ्या पेक्षा कमी कोण, माझ्या पेक्षा वरचढ कोण? हे तरी मला पाहू द्या. अर्जुन म्हणतोय आम्ही तर तडजोड करणार होतो. पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही कारण त्यांना युद्ध हवे आहे. किती शक्तीने ते युद्धात उतरले आहेत ते मला पहावयाचे आहे.

योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः l
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ll२३ll

योत्स्यमानान्, अवेक्षे, अहम्, ये, एते, अत्र, समागताः,
धार्तराष्ट्रस्य, दुर्बुद्धे, युद्धे, प्रियचिकीर्षवः ll२३ll

दुर्योधनाला दुष्टबुद्धी म्हटले आहे. त्यांनी आमचा नाश करण्यासाठी अनेक प्रकार केले, आम्हांला अपमानित केले, आम्ही न्यायानुसार मागितलेले राज्यही देण्यास नकार दिला. आणि अशा माणसाला युद्धात विजयी करण्यांस अनेक राजे आलेत. खरतर मित्रांचे हे कर्तव्य असते की त्यानी आपल्या मित्राचे इहलौकीक व पारलौकीक होत जपावे पण येथे ते कांहीच नाही. या युद्धासाठी उतावीळ झालेल्यांना पाहतो. त्यांनी अधर्माचा, अन्यायाचा पक्ष घेतलाय ते आमच्या पुढे टिकणार नाहीत. आता भगवंत काय करतात हे पुढील श्लोकात पाहू.

सञ्जय उवाच
एवमुक्तो ह्रषीकेशो गुडाकेशेन भारत l
सेनयोरुभरयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ll२४ll

सञ्जय उवाच

एवम्, उक्तः, ह्रषीकेशः, गुडाकेशेन, भारत,
सेनयोः, उभयोः, मध्ये, स्थापयित्वा, रथोत्तमम् ll२४ll

ज्यांचे केस कुरळे आहेत व ज्याचा निद्रेवर अधिकार आहे तो गुडाकेश. जो निद्रा, आळस, सुखाचा गुलाम होत नाही केवळ भगवंताचा भक्त आहे. अशा भक्ताची गोष्ट भगवंत ऐकतात व तो सांगेल तस करतात. श्रीकृष्णानी अर्जुनाच्या सांगण्या प्रमाणे रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी ऊभा केला.
इंद्रियांचा ईश (स्वामी) म्हणजे ह्रषीकेश. २१ व्या श्लोकात व येथे ह्रषीकेश म्हटले आहे जे मन, बुद्धी व इंद्रियांना प्रेरणा देणारे आहेत, सर्वांना आज्ञा देणारे आहेत तेच भगवंत येथे अर्जुनाची आज्ञा पाळणारे आहेत.
दोन्ही सैन्याच्या मध्यभागी ज्याठिकाणी रिकामी जागा होती त्या ठिकाणी भगवंतानी अर्जुनाचा दिव्य रथ उभा केला.

आपण *Surekha's Geetashree* या नावाचे YouTube channel सुरू केले आहे.पहिल्या अध्यायाचे काही श्लोक यावर upload केले आहेत. तरी सर्वांनी *Surekha's Geetashree* या channel ला *Like* करा, *Subscribe* करा व नविन श्लोक अपलोड केल्याचे notification येण्यासाठी *Bell icon* दाबा.

खालील लिंकवर दाबून channel ला subscribe करा.

Channel Subscription विनामूल्य आहे.

भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् l
उवाच पार्थ पश्यैतान्समवेतान्कुरुनिति  ll२५ll

भीष्मद्रोणप्रमुखतः, सर्वेषाम्, च, महीक्षिताम्,
उवाच, पार्थ, पश्यैतां, एतान्, समवेतान्, कुरुन्, इति ll२५ll

श्रीकृष्णाने रथ इतक्या चातुर्याने उभा केला कि जेथून अर्जुनाला पितामह भीष्माचार्य, गुरु द्रोणाचार्य आणि  कौरवसैन्यातील प्रमुख राजलक्ष्मी दिसतील.
कुरुवंशात धृतराष्ट्र पुत्र व पांडू पुत्र दोन्ही येतात.कुरुवंशीयांना पाहून अर्जुनाच्या अंतःकरणात कौटुंबिक भाव उत्पन्न झाला. कसेही असलो तरी आम्ही भावंडे आहोत. मोह उत्पन्न झाला आणि तो व्हावा ही भगवंताची ईच्छा होती. ज्यामुळे मोहीत झालेल्या अर्जुनाचे निमित्त करुन संपूर्ण मानवजातीला गीतेचा महान उपदेश दिला जावा.
कौटुंबिक प्रेम व भगवद् भक्ती या दोन्हीत खुप अंतर आहे. कुटुंबात ममतायुक्त प्रेम असते त्यामुळे अवगुणांकडे लक्ष जात नाही. हे माझे आहेत हा भाव असतो, मोह असतो, अंधार असतो, कर्तव्य टाकणारा असतो. तेच भगवद् भक्तीत भक्त भगवंताचा असतो, भाव असतो, प्रकाश असतो, कर्तव्य पाळतो.
कुरुवंशीयांना पहा म्हंटल्यावर पुढे काय झाले  ते पुढील श्लोकात पाहू

तत्रापश्यात्स्थितान्पार्थः पितृनथ पितामहान् l
आचार्यान्मातुलान्भ्रातृन्पुत्
रान्पौत्रान्सखींस्तथा ll२६ll

तत्र, अपश्यत्, स्थितान्, पार्थः, पितृन्, अथ, पितामहान्,
आचार्यान्, मातुलान्, भ्रातृन्, पुत्रान्, पौत्रान्, सखीन्, तथा ll२६ll
 
युद्धभूमीवर एकत्र जमलेल्या कुरुवंशीयांना पाहताना अर्जुनाची दृष्टी दोन्ही सैन्यातील आपल्या कुटुंबियांवर पडली. आपले वडीलांसमान सगळे काका, भीष्माचार्य, सौमदत्त हे पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य कुलगुरु, पुरुजित, कुंतिभोज, शल्य, शकुनी मामा, भीम, दुर्योधन भाऊ, अभिमन्यू, घटोत्कच, लक्ष्मण दुर्योधनाचा मुलगा असे माझे व माझ्या भावांचे पुत्र उभे आहेत तसेच आमचे पौत्र ही आहेत.

श्वशुरान्सुह्रदयश्र्चैव सेनयोरुभयोरपि l
तान्समीक्ष्य स कौन्तेयः सर्वांन्बन्धूनवस्थितान् ll२७ll
श्वशुरान्, सुह्रदः, च, एव, सेनयोः, उभयोः, अपि। 
तान् समीक्ष्य, स कौन्तेयः, सर्वान् बन्धून्  अवस्थितान् ll२७ll
दुर्योधनाचे अश्वत्थामा इत्यादी मित्र आहेत व आमचेही मित्र आमच्या पक्षात आहेत. द्रुपद, शैब्य इत्यादी सासरेही आहेत. तसेच कोणत्याही हेतुवाचून पक्षाचे होत साधणारे सात्यकी व कृतवर्माही आहेत. तसेच प्रपितामहा बाल्हीक, धृष्टद्युम्न, शिखंडी, सुरथ व जयद्रथ म्हणणेही आहेत. ह्या सर्वांना पाहून अर्जुन अत्यंत भयभीत झाला.
युद्धात कोणीही मरो ते सर्व आपलेच संबंधीत आहेत. नुकसान आमचेच आहे. कुल तर आमचेच नष्ट होईल. अशा विचाराने त्याची युद्धाविषयीची इच्छाच नाहीशी झाली. अंतःकरण भीतीने ग्रासले गेले. या भीतीलाच भगवंतानी अध्याय २ मधील २-३ श्लोकात "कश्मलम्" व "ह्रदयदौर्बल्यम्" म्हंटले आहे आणि अर्जुनाने अध्याय २ श्लोक ७ मध्ये "कार्पण्यदोषोपहतस्वभावः" म्हणून त्याचा स्वीकार केला आहे.
अर्जुनाला पूर्वी भीती नव्हती, ती आता निर्माण झाली. अगन्तुक आहे, त्यामुळे ती राहणार नाही. शूरवीरता आधी पासून होती, स्वाभाविक होती त्यामुळे ती जायचा प्रश्नच नाही.
पण ज्यांनी आपल्यावर अन्याय केला आहे त्या अधर्मी पापी लोकांना बद्दल करुणा येते व तो क्षात्रवृत्ती पासून परावृत्त होऊ पहात आहे. ह्या सर्व विचारांना व्यथित झालेला अर्जुन काय म्हणतोय ते पाहू.

कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्  l
अर्जुन उवाच
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ll२८ll

कृपया, परया, अविष्टः, विषीदन्, इदम्, अब्रवीत्,
अर्जुन उवाच 
दृष्ट्वा, इमम्, स्वजनम्, कृष्ण, युयुत्सुम्, समुपस्थितम् ll२८ll 
अर्जुनाला "कृष्ण" हे संबोधन फार आवडते. ते श्रीकृष्णासाठी गीतेत ९ वेळा आले आहे.  अर्जुनाला श्रीकृष्ण "पार्थ" म्हणून संबोधत असे. अर्जुनाला दोन्ही कडील कुटुंबियांच्या मरणाच्या आशंकेने घेरले आहे.कोणीही मेहेत्रे ते आमचेच. दुर्योधनाचे पाहणे एकतर्फी होते ती युद्ध दृष्टी होती. अर्जुनाचे पाहणे दोन प्रकारचे होते. पहिल्यांदा तो वीरश्रीने युद्ध करण्यांस उभा होता. आणि आता स्वजनांना पाहून भीतीने युद्धा पासून परावृत्त होतो आहे व त्याच्या हातातून धनुष्य गळून पडत आहे.

आपण *Surekha's Geetashree* या नावाचे YouTube channel सुरू केले आहे.पहिल्या अध्यायाचे काही श्लोक यावर upload केले आहेत. तरी सर्वांनी *Surekha's Geetashree* या channel ला *Like* करा, *Subscribe* करा व नविन श्लोक अपलोड केल्याचे notification येण्यासाठी *Bell icon* दाबा.

खालील लिंकवर दाबून channel ला subscribe करा.

Channel Subscription विनामूल्य आहे.

सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति l
वेपतुश्र्च शरीरे मे रोमहर्षश्र्च जायते ll२९ll

सीदन्ति, मम, गात्राणि, मुखम्, च, परिशुष्यति,
वेपथुः, च, शरीरे, मे, रोमहर्षः, च, जायते ll२९ll

गाण्डीवं स्त्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते l
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ll३०ll

गाण्डीवं, स्त्रंसते, हस्तात्, त्वक्, च, एव, परिदह्यते,
न, च, शक्नोमि, अवस्थातुम्, भ्रमति, इव, च, मे, मनःll३०ll
अर्जुनाच्या मनांत युद्धामुळे भविष्यकाळात होणाऱ्या परिणामांची चिंता आहे, दुःख आहे. ह्या चिंतेचा, दुःखाचा परिणाम त्याच्या संपूर्ण शरीरावर होत आहे. माझे हात, पाय, तोंड हे सर्व अवयव शिथील पडले आहेत. मुख कोरडे पडले आहे, बोलताही येत नाही, थरकाप उडाला आहे, शरीर रोमांचित झाले आहे व ज्या गांण्डीवाच्या टणत्काराने शत्रू भयभीत होत होते तेच गांण्डीव आता माझ्या हातातून गळून पडत आहे. शरीराचा दाह होत आहे आणि मन भ्रमित होत आहे. माझे कर्तव्य काय तेच कळत नाही. रथावर उभा राहण्यासही मी असमर्थ आहे. असे  वाटते की मी मूर्च्छित होऊन खाली पडेन. अशा अनर्थकारी युद्धात उभे  राहणे पाप आहे.
 Disclaimer: The views expressed are my personal opinions and the blog is for generic information purpose only. Readers are advised to verify the facts.All content provided in the blog is for informative purpose only. The owner of this blog makes no representations as to the accuracy or completeness of any information on this blog or bound by following any link on this blog. The owner will not be liable for any errors or omissions in the information nor for the availability of the information. The owner will not be liable for any losses, injuries or damages from display or use of this information. These terms and conditions of use are subject to change at any time and without notice.

Wednesday 1 January 2020

Chapter 1 Part 2 (11-20) अध्याय १ भाग २ (११ - २०)

अध्याय पहिला  श्लोक ११ - २०

नमस्कार!

'सुरेखाज् गीताश्री' 

उद्देश हाच की गीतेचे श्लोक सहजरीत्या शब्दांची फोड करून म्हणता यावेत.  त्याचा अन्वयार्थ समजून घ्यावा या साठी हा माझा प्रयत्न.  

हा ब्लॉग माझे मत व्यक्त करते. ह्या मधे अनेक ग्रंथांचे, पुस्तकांचे, आॅन लाईन मिडीया, माझे सहकारी व आपणां सर्वांचेही संदर्भ व मार्गदर्शन समाविष्ट आहे. आपण आपल्या सद्सद्विवेकबुद्धीस अनुसरून व सत्यता पडताळणीकरुनच पुढील वाटचाल कराल ही खात्रीवजा अपेक्षा.

आपण *Surekha's Geetashree* या नावाचे YouTube channel सुरू केले आहे.पहिल्या अध्यायाचे काही श्लोक यावर upload केले आहेत. तरी सर्वांनी *Surekha's Geetashree* या channel ला *Like* करा, *Subscribe* करा व नविन श्लोक अपलोड केल्याचे notification येण्यासाठी *Bell icon* दाबा.

खालील लिंकवर दाबून channel ला subscribe करा.

Channel Subscription विनामूल्य आहे.

|| श्री परमात्मने नमः ||

अथ प्रथमोऽध्यायः |
 
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताःl
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ll११ll

अयनेषु, च, सर्वेषु, यथाभागम्, अवस्थिताः,
भीष्मम्, एव, अभिरक्षन्तु, भवन्तः, सर्वे, एव, हि ll११ll

ज्या ज्या आघाड्यांवर आपली नियुक्ती झाली आहे ती ती आघाडी सर्व योध्यानी दृढपणे सांभाळावी व भीष्माचार्यांचे रक्षण चोहीबाजूने करावे. अस म्हणून तो भीष्माचार्यांना आपलस करायचा प्रयत्न व दुसरे महत्वाचे कारण शिखंडी त्यांच्या समोर यायला नको. जर शिखंडी समोर आला तर ते त्याच्यावर शस्त्र चालविणार नाहीत कारण त्यांनी तशी प्रतिज्ञाच केली आहे. शिखंडी शंकराच्या वरांने भीष्माचार्यांना मारण्यासाठीच उत्पन्न झाला आहे. जर शिखंडी पासून भीष्माचार्यांचे रक्षण झालेतरच आमचा विजय निश्चित होईल. दुर्योधनाप्रती भीष्माचार्यांनी दाखवलेल प्रेम, जिव्हाळा पुढील श्लोकात पाहू.

तस्य संजनयन्हर्षं कुरुवृद्धः पितामहःl
सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान् ll१२ll

तस्य, संजनयन्, हर्षम्, कुरुवृद्धः, पितामह,
सिंहनादम्, विनद्य, उच्चैः, शङ्खम्, दध्मौ, प्रतापवान् ll१२ll

दुर्योधनाला हर्षित करीत भीष्माचार्यांनी शंख वाजविला. कुरुवंशातील सर्वात वृद्ध वयानुसार बाल्हीक भीष्माचार्यांचे काका होते, पण भीष्माचार्य धर्माला व परमेश्वराला विशेष अर्थाने जाणत होते म्हणून त्या ज्ञानवृद्धानां संजय कुरुवृद्धः असे संबोधतात. भीष्माचार्यांच्या त्यागाचा फार मोठा प्रभाव होता. त्यांनी कनक व कामिनीचा त्याग केला होता. ते शस्त्रास्त्र विद्येत निपुण होते व सर्व शास्त्र ही उत्तम जाणत होते. आजोबांना आपल्या नातवाचा, दुर्योधनाचा, बालिशपणा व धूर्तपणा लक्षात आला होता म्हणून त्यांनी त्याला आनंदीत करण्यासाठी शंख वाजविला. ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकुन सर्व भयभीत होतात तसे भीष्माचार्यांनी आपला शंख वाजवून सर्वांना भयभीत व दुर्योधनाला आनंदीत केले. पितामह भीष्माचार्यांनी शंख वाजविल्यामुळे काय परीणाम झाला ते
पुढील श्लोकात पाहू.

जेंव्हा भीष्माचार्य शरपंजरी पडले होते, तेंव्हा श्रीकृष्णाने धर्मराजाला सांगितले की धर्म विषयक काही शंका असल्यास त्याचे समाधान भीष्माचार्यांकडून करुन घे.

ततः शङ्खाश्र्च भेर्यश्र्च पणवानकगोमुखाः l
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ll१३ll

ततः, शङ्खाः, च, भेर्यः, च, पणवानकगोमुखाः,
सहसा, एव, अभ्यहन्यन्त, सः, शब्दः, तुमुलः, अभवत् ll१३ll
 
भीष्माचार्यांनी दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठी शंख वाजविला पण कौरव सैन्याला वाटले की हे शंख वादन म्हणजे युद्ध सुरु झाल्याची घोषणाच आहे, म्हणून भीष्माचार्यांचे शंख वादनानंतर कौरव सैन्यातील शंख आदी रणवाद्ये एकदम वाजू लागली होती. ती रणवाद्ये शंख, भेरी, पणव, आनक, गोमुख होत. कौरव सेनेत अत्यंत उत्साह असल्याने त्यांच्या सेनेतील रणवाद्ये वाजविण्यास उशीर किंवा फार परीश्रम लागले नाहीत व वेगवेगळ्या विभागात, तुकड्यात उभ्या असलेल्या कौरवसेनेने वाजवलेल्या रणवाद्यांचा नाद भयंकर मोठ्याने घुमत राहिला. धृतराष्ट्राने संजयला सुरवातीलाच विचारले होते की"युद्धक्षेत्रात माझ्या व पांडुच्या पुत्रांनी काय केले? "म्हणून संजयने दुसऱ्या श्लोका पासून तेराव्या श्लोका पर्यंत" धृतराष्ट्र पुत्रांनी काय केले"हे सांगितले. आता पुढील श्लोकांपासून "पांडव पुत्रांनी काय केले" त्याचे हे पाहू.
 
ततः श्र्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ l
माधवः पाण्डवाश्र्चैव दिव्यौ शङ्खौं प्रदध्मतुः ll१४ll

ततः, श्र्वेतैर्हयैर्युक्ते, हयैः, युक्ते, महति, स्यन्दने, स्थितौ,
माधवः, पाण्डवः, च, एव, दिव्यौ, शङ्खौ, प्रदध्मतुः ll१४ll
चित्ररथ गंधर्वाने अर्जुनाला दिव्य असे शंभर घोडे दिले होते. ह्या घोड्यांचे वैशिष्ट्य असे की यापैकी युद्धात कितीही घोडे मारले गेले तरी घोड्यांची संख्या शंभरच रहायची. हे घोडे पृथ्वी, स्वर्ग कोठेही जाऊ शकत होते. असे चार घोडे अर्जुनाच्या रथाला जुंपलेले होते. अग्नींने खांडववन जाळल, नंतर अर्जुनाला एक विशाल रथ दिला होता त्यात नऊ बैलगाडी भरतील ईतकी शस्त्रास्त्रे असत. तो सोन्याने मढवलेला अत्यंत तेजःपुंज रथ होता. त्यावरील ध्वज विजेप्रमाणे चमकत होता व एक योजने म्हणजे चारकोसा पर्यंत फडकत असे व त्यावर श्रीहनुमानजी विराजमान होते. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण  व त्याचा भक्त अर्जुन विराजमान झाले होते. त्यामुळे रथाची शोभा व तेज आणखी वाढले. माधव - श्रीकृष्ण, पाण्डव - अर्जुन. नर व नारायण दोघेही. दोघांच्याही हातात दिव्य तेजःपुंज व अलौकिक शंख होते. ते त्यांनी खुप जोरात वाजविले. आता येथे आपल्याला असे वाटते की प्रथम शंख सेनापतींनी वाजवायला हवा होता, मग श्रीकृष्णाने का वाजविला? भगवंत सारथी असूदेत की महारथी असू देत ते प्रमुखच आहेत. ते सर्वांहून श्रेष्ठच आहेत आणि तेच सर्वांचे संचालन करतात. म्हणून त्यांनी पहिल्यांदा शंख वाजविला.
आता पुढील चार श्लोकात शंख वादनाचे वर्णन आहे ते पाहू.

पाञ्चजन्यं ह्रषीकेशो देवदत्तं धनञ्जयःl
पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः ll१५ll

पाञ्चजन्यम्, ह्रषीकेशः, देवदत्तम्, धनंजयः,
पौण्ड्रम्, दध्मौ, महाशङ्खम्, भीमकर्मा, वृकोदरः ll१५ll
श्रीकृष्णाने पाञ्चजन्य शंख वाजविला. भगवंतानी
पाञ्चजन्य नावाच्या  शंखरुप धारण करणाऱ्या राक्षसाला ठार मारुन त्याला शंखरुपाने आपल्या जवळ ठेवले, म्हणून हा पांजजन्य. अर्जुनाचे नांव धनंजय त्यांने राजसूय यज्ञाच्यावेळी असंख्य राजांना जिंकून खूप मोठ्या प्रमाणात धन एकत्रित केले म्हणून तो धनंजय. तसेच त्याला इंद्राने नितातकवचादी दैत्याबरोबर युद्ध करतांना देवदत्त नांवाचा शंख दीला. त्याचा आवाज खूप मोठ्याने होत असे. अर्जुनाने देवदत्त नांवाचा शंख फुंकला. हिडिंबा सुर, बकासुर, जटासुर, किचक, जरासंध ह्यांना ठार मारल्याने भीमाचे नांव भीमकर्मा पडले तसेच त्याच्या पोटात वृक नांवाचा अग्नी होता. म्हणून तो वृकोदर.भीमाने पौंड्र नांवाचा शंख फुंकला.

आपण *Surekha's Geetashree* या नावाचे YouTube channel सुरू केले आहे.पहिल्या अध्यायाचे काही श्लोक यावर upload केले आहेत. तरी सर्वांनी *Surekha's Geetashree* या channel ला *Like* करा, *Subscribe* करा व नविन श्लोक अपलोड केल्याचे notification येण्यासाठी *Bell icon* दाबा.

खालील लिंकवर दाबून channel ला subscribe करा.

Channel Subscription विनामूल्य आहे.

अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः l
नकुलः सहदेवश्र्च सुघोषमणिपुष्पकौ ll१६ll

अनन्तविजयम्, राजा, कुन्तीपुत्रः, युधिष्ठिरः,
नकुलः, सहदेवः, च, सुघोषमणिपुष्पकौ ll१६ll
कुन्तीपुत्र युधिष्ठिराला राजा संबोधले आहे. कारण भविष्यकाळात युधिष्ठिर संपूर्ण पृथ्वीचे राजे होणार आहेत हा संकेत संजयनी दिला. अनंतविजय नामक शंख युधिष्ठिराने वाजविला. नकुलांनी सघोष नांवाचा शंख व सहदेवांनी मणिपुष्पक नांवाचा शंख वाजविला. 

काश्यश्र्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः l
धृष्टद्युम्नो विराटश्र्च सात्यकिश्र्चापराजितः ll१७ ll

काश्यः, च, परमेष्वासः, शिखण्डी, च, महारथः,

धृष्टद्युम्नः, विराटः, च, सात्यकिः, च, अपराजितः ll१७ll

द्रुपदो द्रौपदेयाश्र्च सर्वशः पृथिवीपते l

सौभद्रश्र्च महाबाहुः शङ्खान्दध्मुः पृथक् पृथक् ll१८ll

द्रुपदः, द्रौपदेयाः, च, सर्वशः, पृथिवीपते,

सौभद्रः, च, महाबाहुः, शङ्खान्, दध्मुः, पृथक्, पृथक्ll१८ll
हे राजन् श्रेष्ठ धनुर्धारी काशिराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, राजा विराट, अजेय सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे पाच पुत्र तसेच विशाल बाहू असणारा सुभद्रा पुत्र अभिमन्यू यांनी सर्व बाजूंनी आपआपले वेगवेगळे शंख वाजविले.
कौरवसेनेच्या पितामह भिष्मांचेच फक्त नांव घेतले तर पांडव सेनेच्या अठरा वीरांची नांवे घेतली. संख्यमाना प्रमाणे अधर्माच्या पक्षाचे जास्त वर्णन नको होते. धर्माच्या पक्षाचे जेथे प्रत्यक्ष भगवंत आहेत त्यां पक्षाचे अधिक वर्णन केले. पांडव सेनेच्या शंख वादनाचा कौरवसेनेवर काय परीणाम झाला ते पुढील श्लोकात सांगीतले आहे. 

सघोषो धार्तराष्ट्राणां ह्रदयानि व्यदारयत् l
नभश्र्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ll१९ll

सः, घोषो, धार्तराष्ट्राणाम्, ह्रदयानि, व्यदारयत्,

नभः, च, पृथिवीम्, च, एव, तुमुलः, व्यनुनादयन् ll१९ll
पांडवसेनेचे शंखवादन तीव्र, भयंकर, मोठे होते. त्याच्या ध्वनीप्रतिध्वनींने पृथ्वी, आकाश व्यापून गेले. त्या  आवाजाने अन्यायाचे राज्य हडप करू इच्छिणारे व त्यांना मदत करणारे सर्वांची ह्रदये विदीर्ण झाली. कौरवसेनेचा उत्साह, बळ कमजोर झाले आणि त्यांना पांडवसेनेचे भय वाटू लागले. तेच कौरवसेनेच्या शंखवादनाचा काहीही परीणाम पांडवसेनेवर झाला नाही. ते स्थिर होते कारण ते धर्मानुसार वागात होते, कर्तव्याचे पालन करत होते, त्यांचा पक्ष न्यायाचा होता म्हणून त्यांना भिती नव्हती तर उत्साह होता.ह्या वरुन आपण एक गोष्ट समजली पाहिजे आपणा कडुन आपल्या शरीर, वाणी, मन यांच्या द्वारे कधीही अन्याय  व अधर्माचे आचरण करायचे नाही. अन्याय व अधर्माने आपले ह्रदय कमकुवत व बलहीन होते.आता पर्यंत धृतराष्ट्राच्या प्रश्नांची उत्तरे दिली. आता या पुढे भगवद्गीता ज्या प्रसंगानंतर सांगितली गेली तो प्रसंग सांगण्यास संजय सुरवात करतात.

आपण *Surekha's Geetashree* या नावाचे YouTube channel सुरू केले आहे.पहिल्या अध्यायाचे काही श्लोक यावर upload केले आहेत. तरी सर्वांनी *Surekha's Geetashree* या channel ला *Like* करा, *Subscribe* करा व नविन श्लोक अपलोड केल्याचे notification येण्यासाठी *Bell icon* दाबा.

खालील लिंकवर दाबून channel ला subscribe करा.

Channel Subscription विनामूल्य आहे.

अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान्कपिध्वजः l
प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पाण्डवः ll२०ll

अथ, व्यवस्थितान्, दृष्ट्वा, धार्तराष्ट्रान्, कपिध्वजः,

प्रवृत्ते, शस्त्रसंपाते, धनुः, उद्यम्य, पाण्डवःll२०ll
आता 'अथ' म्हणजे सुरुवात, संजय भगवान श्रीकृष्ण व अर्जुनाच्या संवादरुपी श्रीमद्भगवदगीतेस सुरवात करतात. अठराव्या अध्यायाच्या चौऱ्याहत्तराव्या  (७४) श्लोकात 'इति' पदाने संवाद समाप्त होतो. तसेच दुसऱ्या अध्यायाच्या अकराव्या  (१८) श्लोकांपासून उपदेशास सुरवात होते व अठराव्या अध्यायाच्या सहासष्टाव्या (६६)  श्लोकात हा उपदेश समाप्त होतो.
युद्धाला सज्ज झालेले सैन्य पाहून अर्जुनाला विरश्री संचारली आणि त्यांने आपले गांण्डीव हातात घेतले. आता येथे पहा दुर्योधनाने जेंव्हा पांडव सैन्य पाहीले तेंव्हा तो धावत धावत द्रोणाचार्यांच्या कडे गेला होता. दुर्योधनाच्या अंतःकरणात भय तर अर्जुनाच्या अंतःकरणात निर्भयता, उत्साह, वीरता आहे.अर्जुनाचे रथाच्या ध्वजावर श्रीहनुमानजी विराजमान आहेत. त्यांचाच विजय निश्चित आहे. धृतराष्ट्राला वारंवार पांडवांची आठवण करुन देण्यासाठी हा पांडवा शब्द. चौदाव्या श्लोकात ही आहे कारण हाच शब्द धृतराष्ट्रांने प्रथम वापरला.

Disclaimer: The views expressed are my personal opinions and the blog is for generic information purpose only. Readers are advised to verify the facts.All content provided in the blog is for informative purpose only. The owner of this blog makes no representations as to the accuracy or completeness of any information on this blog or bound by following any link on this blog. The owner will not be liable for any errors or omissions in the information nor for the availability of the information. The owner will not be liable for any losses, injuries or damages from display or use of this information. These terms and conditions of use are subject to change at any time and without notice.

Monday 30 December 2019

Chapter 1 Part 1 (01-10) अध्याय १ भाग १ (१ - १०)

अध्याय १ -  श्लोक १ - १०

नमस्कार!

'सुरेखाज् गीताश्री' 

उद्देश हाच की गीतेचे श्लोक सहजरीत्या शब्दांची फोड करून म्हणता यावेत.  त्याचा अन्वयार्थ समजून घ्यावा या साठी हा माझा प्रयत्न.  

हा ब्लॉग माझे मत व्यक्त करते. ह्या मधे अनेक ग्रंथांचे, पुस्तकांचे, आॅन लाईन मिडीया, माझे सहकारी व आपणां सर्वांचेही संदर्भ व मार्गदर्शन समाविष्ट आहे. आपण आपल्या सद्सद्विवेकबुद्धीस अनुसरून व सत्यता पडताळणीकरुनच पुढील वाटचाल कराल ही खात्रीवजा अपेक्षा.

|| श्री परमात्मने नमः ||

अथ प्रथमोऽध्यायः |

पांडवांनी बारा वर्षाचा वनवास एक वर्षाचा अज्ञातवास संपवून आपले अर्धे राज्य मागितले पण दुर्योधनाने सुईच्या अग्रावर मावेल ईतकी जमीन सुद्धा देण्याचे नाकारले युद्ध होणार हे निश्चित झाले. महर्षी व्यासांनी संजयला दिव्यदृष्टी दिली. त्यांनी धृतराष्ट्राला युद्धातील संपूर्ण घटनांचा समाचार सांगितला.
                 
धृतराष्ट्र उवाच
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः l
मामकाः पाण्डवाश्र्चैव किमकुर्वत संजय llll

कुरुक्षेत्रात देवतांनी यज्ञ केला होता. कुरुराजांने तपश्चर्या केली होती. यज्ञादी धर्मीय कर्मे कुरुराजाची तपोभूमी असल्याने धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. संसारात प्रामुख्याने भूमी, धन स्त्री यासाठीच लढाया होतात. कुरु वंशाचा भूमीवर अधिकार त्यासाठीच युद्ध. आपल्या वैदिक संस्कृतीत सांगितले आहे की कोणतेही कार्य करायचे असेल तर ते धर्माला अनुसरूनच. युद्धात मरणाऱ्यांचा उद्धार व्हावा, कल्याण व्हावे म्हणून युद्धासारखे भयंकर कार्यही धर्मभूमी, तीर्थभूमीवरच होते. दोन्ही सैन्यांना युद्धाची ईच्छा होती पण दुर्योधनाला फार होती. मुख्य उद्देश राज्यप्राप्ती. मग त्यासाठी वाटेल ते. युधिष्ठिर मात्र धर्म रक्षणासाठी युद्धाला तयार झाला. धृतराष्ट्र आपल्या पांडुच्या पुत्रात समभाव कधीच पहात नव्हता. म्हणून त्यांनी मामकाः पाण्डवा असे शब्द वापरले. धृतराष्ट्रास संजय कडून सर्व लहानमोठ्या गोष्टी क्रमवार, विस्तारपूर्वक, योग्यप्रकारे जाणून घेण्याची ईच्छा होती.  दही घुसळल्यावर जसे लोणी निघते तसे धृतराष्ट्राच्या मनात झालेल्या चलबिचलांने युद्ध निर्माण झाले आणि अर्जुनाच्या मनात झालेल्या चलबिचलांने गीता प्रगट झाली.

         संजय उवाच
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदाl
आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत् llll

दोन्ही पक्षांकडील सैन्य युद्धासाठी कसे उभे राहिले ते संजय धृतराष्ट्राला सांगतो. पांडवांची सेना अत्यंत उत्तम रीतीने ऐक्यभावनेने उभी होती. त्या पक्षात धर्म श्रीकृष्ण होते त्यामुळे संख्येने कमी असूनही त्यांच्या सैन्यात तेज होते. त्याचा प्रभाव दुर्योधनावर फार मोठा पडला म्हणून तो द्रोणाचार्यांनजवळ जाऊन नीतीयुक्त अशी गंभीर वचने बोलतो.  दुर्योधनच सर्व राज्यकारभार पाहत होता म्हणून त्याला राजा असे संबोधले. धृतराष्ट्र नाममात्र राजा होता. द्रोणाचार्यांनजवळ जाण्याची तीन कारणे असतील. ---आपला स्वार्थ साधण्यासाठी पांडवांन बद्दल द्वेष भावना निर्माण करण्यासाठी. ---व्यवहारीक दृष्टीने गुरूंना वंदन करण्यासाठी ---युद्धामध्ये प्रमुख व्यक्तीचे योग्य ठिकाणी उभे राहणे महत्वाचे असते त्यासाठी.  दुर्योधन नीतीयुक्त अशी गंभीर वचने बोलतो ज्यामुळे द्रोणाचार्यांच्या मनांत पांडवांन विषयी द्वेष भावना निर्माण व्हावी आणि ते आपल्याच बाजूने राहून उत्तम प्रकारे लढावेत. आपलाच विजय होईल स्वार्थ साधला जाईल.

पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् |
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता llll

द्रोणाचार्यांनीच कौरवपांडवाना शस्त्रविद्या शिकवली. ते दोघांचेही गुरु आहेत. त्यामुळे त्यांनी कोणाचीही बाजू घेऊ नये. आचार्य आपणांस मारण्यासाठी उत्पन्न झालेल्या धृष्टद्युम्नालाही आपण शस्त्रास्त्र विद्या शिकवलीत तो शिष्य ही हुशार आहे. त्याचा उल्लेख द्रुपदपुत्र असा करतोय दुर्योधन कारण द्रुपद द्रोणाचार्यांच वैर होत आहे त्याचा बदला घ्यायची ही उत्तम संधी आहे.  द्रुपदपुत्राने व्यूहाकार रचना केली ती पांडवांची प्रचंड सेना पहा. तुम्हाला ठार करण्यासाठीच द्रुपदपुत्राला सेनापती केलाय. खर तर, कौरवांनी अकरा अक्षौहिणी सैन्य पांडवांन कडे सात अक्षौहिणी सैन्य आहे. तरीपण दुर्योधन पांडवांच्या सैन्याला प्रचंड सेना म्हणतो कारण त्याची रचना अशी केली होती की ते जास्त वाटत होते आणि दुसरे पांडवांच्यात एकी होती एकमत होते त्यामुळे ती प्रचंड बलवान वाटायची हे द्रोणाचार्यांना सारख सारख दाखवून द्यायचे. तुमच्या शिष्याचा पराभव करणे तुम्हाला सहज शक्य आहे.
आपण कोणत्या प्रकारांनी त्यांच्यावर विजय मिळवू शकू ह्याचा लवकर निर्णय घ्या

अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि l
युयुधानो विराटश्र्च द्रुपदश्र्च महारथः llll

विशाल धनुष्यावर बाण योजून प्रत्यंचा ओढण्यासाठी खूप शक्ती लागते. शक्तिशाली सोडलेला बाण अचूक मारा करतो. हे सगळे बलवान शूरवीर आहेत. सामान्य योद्धे नव्हेत. ते युद्धकलेमध्ये भीमार्जुन सारखे निपुण आहेत.
युयुधानो म्हणजे सात्यकी ज्यांनी अर्जुना कडून शस्त्रास्त्र विद्या शिकली. तो अर्जुनाच्या बाजुने युद्धासाठी ऊभा राहीला. द्रोणाचार्यांच्या मनांत अर्जुना विषयी द्वेष भावना निर्माण करण्यासाठी की तो आपल्या गुरुंन कडून लढतोय पण तुमचा शिष्य ज्याला तुम्ही सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवलत तो तुमच्या विरोधात आहे.  विराट राजाच नांव घेतो. ह्याच्या कडून आपला वीर सुशर्मा अपमानित झाला होता. आपणांसही त्यांने संमोहन अस्त्राने मोहीत केले होते आणि आम्हालाही त्याचा गायी सोडून पळावे लागले. तो आपल्या विरोधात आहे. विराट आहे नांव द्रुपद राजाच्या आधी. दुर्योधन महा चालाख  तो पद्धतशीरपणे द्रोणाचार्यांना उसकवत आहे. त्यांनी मन लावून युद्ध करावे.असे सगळे महारथी आपल्या समोर युद्धासाठी आहेत. युद्धामध्ये जो वीर दहादहा हजार धनुर्धारी सैन्याचे संचालन करु शकतो अशा वीर पुरुषास महारथी म्हणतात.

धृष्टकेतुश्र्चेकितानः काशिराजश्र्च वीर्यवान् l
पुरुजित्कुन्तिभोजश्र्च शैब्यश्र्च नरपुङ्गवः llll

धृष्टकेतुः हा शिशूपालाचा मुलगा. शिशूपालाचा वध श्रीकृष्णाने केला. तरी हा त्यांच्या कडूनच लढतोय.
चेकितानः हा यादव. सर्व यादव सेना माझ्या कडे आहे लढायला पण हा मात्र पांडवा कडून. काशिराजश्र्च वीर्यवान् काशिराज अत्यंत शूरवीर महारथी आहे. आपण अत्यंत सावधगिरींने युद्ध करायला हवे. पुरुजित्कुन्तिभोजश्र्च पुरुजित कुंतिभोज हे दोघेही कुंतिचे भाऊ, आमचे मामा पण ते ही पांडवांन कडे आहेत.  शैब्यश्र्च नरपुङ्गवः शैब्य युधिष्ठिराचा सासरा. मनुष्यांन मधे श्रेष्ठ बलवान आहे. तो ही त्यांच्या कडूनच आहे.

युधामन्युश्र्च विक्रान्त उत्तमौजाश्र्च वीर्यवान् l
सौभद्रो द्रौपदेयाश्र्च सर्व एव महारथाः llll

युधामन्युश्र्चविक्रान्तः उत्तमौजाश्र्चवीर्यवान्. पांचाल देशाचे अत्यंत बलवान शूरवीर योद्धे युधामन्यु उत्तमौजा माझ्या  वैऱ्याच्या, अर्जुनाच्या रथाच्या चाकांचे रक्षणासाठी नेमले आहेत. आपण त्यांच्या कडे लक्ष ठेवावे.
सौभद्रः श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा पुत्र अभिमन्यू. हा अत्यंत शूरवीर आहे. ह्यांने गर्भावस्थेतच चक्रव्यूह भेदनाची विद्या शिकला आहे. आपण जेंव्हा आपल्या सैन्याची चक्रव्युहाकार रचना करु तेंव्हा ह्याच्या कडे लक्ष ठेवायला लागेल. द्रौपदेयाश्र्च. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या पाच जणांचे द्रौपदीच्या उदरी जन्मलेले प्रतिविंध्य, सुतसोम, श्रुतकर्मा, शतानीक श्रुतसेन आहेत त्या पाचही जणांना ठार मारुन बदला घ्या. त्यांच्या आईने भरसभेत माझी थट्टा करुन ह्रदय दुखावले आहे. सर्व एव महारथाः. हे सर्व महारथी आहेत. // श्लोकात पांडवसेनेची विशेषता वर्णिले आहे दुर्योधनाने. आता पुढील तीन श्लोकात आपल्या सैन्याची विशेषता वर्णन करतो.

अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम l
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमिते llll

दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो ज्याप्रमाणे पांडवांच्या सैन्यामधे श्रेष्ठ महारथी आहेत त्याच प्रमाणे आपल्या सैन्यातही आहेत तर ते पांडव सैन्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचे आहेत. तिसऱ्या श्लोकात "पश्य" म्हंटलाय येथे तो "निबोध" म्हणतो. पश्य पांडवांचे सैन्य पुढे पहा आता निबोध कौरवांचे सैन्य आचार्यांच्या पाठीमागे आहे तिकडे ध्यान द्या. नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि  ते. माझ्या सेनेत सुद्धा जे विशिष्ट सेनापती, सेनानायक, महारथी आहेत त्यांची केवळ नांवे आपल्याला सांगतो बोटाने दाखवतो कारण आपण सर्वांनाच जाणता. येथे दुर्योधनाला म्हणायचे आहे आपला पक्ष कितीही बलवान असला तरी शत्रू पक्षाला कमी लेखू नका. श्रीकृष्ण स्वतः सर्व धर्मात्मे पांडव पक्षात असल्यांने त्यांचा प्रभाव होता हा प्रभाव दुर्योधनावरही पडला. पण दुर्योधनाचा भौतिक शक्तीवर विश्वास होता. अनित्यावर. म्हणून तो म्हणतो माझ्या पक्षात जी विशेषता आहे ती पांडव पक्षात नाही. आम्ही सहज त्यांच्यावर विजय मिळवू.

भवान्भीष्मश्र्च कर्णश्र्च कृपश्र्च समितिञ्जयः l
अश्र्वत्थामा विकर्णश्र्च सौमदत्तिस्तथैव llll

आपण स्वतः पितामह भीष्म या दोघांची बरोबरी कोणीच करु शकत नाही.आपल्या पुढे देवता, यक्ष, राक्षस कोणीही टीकाव धरणार नाही. कर्ण अत्यंत शूरवीर आहे. तो एकटाच पांडवं सेवेवर विजय मिळवेल. कृपाचार्य तर चिरंजीव आहेत. ते सुद्धा पांडवं सेनेवर विजय मिळवू शकतात. संग्रामविजयी असे त्यांना म्हंटले आहे. अश्वत्थामा ही शूरवीर आहेत. आपणा कडूनच शिक्षण घेतलाय आपले पुत्र आहेत. केवळ पांडवच धर्मात्मे नाहीत आमच्या पक्षातील विकर्ण सौमदत्ततचे पुत्र भूरिश्रवाही धर्मात्मे आहेत.  हे आचार्य आमच्या सैन्यामधे आपण स्वतः, भीष्माचार्य, कर्ण, कृपाचार्य जसे महान योद्धा आहात तसे पांडव सेनेत कोणी नाही. आमच्या सेनेत कृपाचार्य अश्वत्थामा हे दोघेही चिरंजीव आहेत पण पांडव सेनेत असे चिरंजीव कोणीच नाहीत. आमच्या सेनेत ही धर्मात्मे आहेत त्यामुळे घाबरण्याचे मुळीच कारण नाही.

अन्ये बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः l
नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाःllll

मी आत्ता पर्यंत आपल्या सैन्यातील जितक्या शूरवीरांची नांवे सांगितली त्यांच्या व्यतिरिक्त बाल्हीक, शल्य, जयद्रथ पण आहेत जे माझ्यासाठी प्राणार्पण करतील पण मागे हटणार नाहीत. हे सर्व लोक निरनिराळ्या शस्त्र कलेत प्रवीण आहेत निपुण आहेत. युद्ध कसे करावे, कोणत्या प्रकारे करावे, युक्त्या कोणत्या योजण्यात. दुर्योधनाची अशी वचने ऐकूनही द्रोणाचार्य काहीच बोलले नाहीत. तेंव्हा दुर्योधनाला आपली चालाखी, धूर्तपणा चालला नाही. आता पुढे तो काय म्हणतो ते पुढील श्लोकात पाहू.

अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् l
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ll१०ll

अधर्म, अन्याय यामुळे दुर्योधन भयभीत आहे. आपल सैन्य पांडवांन पेक्षा जास्त असूनही आपण पांडवांवर विजय मिळवण्यात असमर्थ आहोत असे त्याला वाटते कारण पांडवांच्यात एकी, संघटन, निर्णयात, निःसंकोचता आहे. ते आमच्यात नाही. भीष्मपितामहंचा कल पांडवांकडे आहे ते त्यांचेच कल्याण चिंतीतात. श्रीकृष्णाचे परम भक्त आहेत. युधिष्ठिराचा आदर आहे अर्जुनावर प्रेम आहे. मग ते आपले सेनापती असले तरी काय सामना करतील.
मला लहानपणापासून हरवत आलेला भीम  बलवान आहे. पांडवांचा संरक्षक आहे. त्यांने एकट्यानेच माझ्या सह शंभर कौरवांना मारण्याची प्रतिज्ञा केली आहे. त्याच शरीर वज्राप्रमाणे कठीण आहे. विषाचाही त्याच्यावर परीणाम झाला नाही. असा भीम त्यांचा संरक्षक आहे. इतकी भीती दुर्योधनाच्या मनांत असूनही तो द्रोणाचार्यांना पांडवांविरूद्ध भडकवतोय कारण अधर्मी, अन्यायी, पापी माणूस कधीही निर्भय सुखशांतीने राहू शकत नाही.
आता
 पुढील श्लोकात दुर्योधन पितामह भीष्मांना काय म्हणतो ते पुढील ब्लॉगमधे  पाहू.